तळेरे, : - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या शुगर केन हार्वेस्टर मशीनचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते पियाळी येथे आज (बुधवारी) करण्यात आले. अलीकडच्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात उस शेती केली जात असून या उसाची तोडणी यापुढे या मशीनद्वारे करण्यात येईल. यावेळी माजी उपसभापती संतोष कानडे, तुळशीदास रावराणे, जि. प. सदस्य संजय आग्रे, सुरेश सावंत, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, वाघेरी सरपंच संतोष राणे, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे शेती अधिकारी एस. एस. पवार, बँक स्थायी अधिकारी एस. एम. यादव, पोलीस पाटील सुनील पवार आदी उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत यांच्या हस्ते या यंत्राचे विधिवत पूजन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उस शेतकऱ्यांना उस तोडणीसाठी येणाऱ्या असंख्य अडचणी लक्षात घेऊन संतोष कानडे यांनी हे यंत्र घेतले असून या यंत्राने एका दिवसात सुमारे १५० टन उस तोडणी करू शकते.
यामुळे एका दिवसाला सुमारे ७० ते ८० मजुरांचे काम या यंत्रामुळे होणार आहे. शिवाय कारखान्याच्या उस तोडणी टोळीची वाट न पाहता परिसरातील शेतकऱ्यांची उस तोडणी या यंत्रामुळे वेळेवर होण्यास मदत होईल.

कमी वेळेत जास्तीत जास्त काम होणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पियाळी, लोरे, वाघेरी, फोंडा, कासार्डे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे उस तोडणी यंत्राने लवकरच उस तोडणी करण्यात येणार आहे.