राज्यातील पहिली सागरी जलतरण स्पर्धा वेंगुर्ले-निवती बीचवर

 वेंगुर्ले प्रतिनिधी-

क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर माझा सिधुदुर्ग जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहे. यासाठी वेंगुर्ले-नवाबाग येथे मध्यंतरीच्या काळात राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली होती आणि आता निवती बीचवर होणा-या राष्ट्रीय स्तरावरील सागरी जलतरण स्पर्धेसाठीही आपले पूर्ण सहकार्य राहणार असून यावर्षीच नव्हे तर दरवर्षीच ही स्पर्धा आयोजित करावी असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सागरी जलतरण स्पर्धेच्या नियोजन बैठकीवेळी केले. दरम्यान, या स्पर्धेसाठी आमदार निधीतून ३ लाख रुपये तर स्पर्धा महोत्सवासाठी २ लाख रुपये देण्याची ग्वाही श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

अखिल भारतीय जलतरण संघटनेच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्यावतीने तसेच शिवम फाउंडेशन सिंधुदुर्ग, स्थानिक मच्छिमार संघटना, मच्छिमार सोसायट्या व निवती ग्रामस्थ यांच्या सहकार्याने राज्यातील पहिल्या लांब पल्ल्याच्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन २५ नोव्हेंबर रोजी निवती समुद्र किना-यावर करण्यात आल्याची माहिती आयोजन सागरी जलतरण स्पर्धा समितीचे कार्याध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्पर्धा संयोजन समितीच्या कार्याध्यक्षा स्नेहा कुबल, शिवम फाउंडेशन सिंधुदुर्ग अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना अध्यक्ष श्रीधर मेतर, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक जलतरणपटू सौरभ सांगवेकर, ऑर्गनायझर सेक्रेटरी रामदास सांगवेकर, सचिव मंगेश चव्हाण, उपसरपंच अजित खवणेकर, माजी सरपंच विजय मेतर, तांत्रिक अधिकारी सुबोध सुळे, सहाय्यक अजय अग्रवाल, छत्रपती पुरस्कार विजेते सुखविदर सिग, नगरसेवक नागेश गावडे, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे यांच्यासहीत विविध मच्छिमार संघटना अध्यक्ष, स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेच्या स्पर्धा दूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिटर)पदी सिधुदुर्गचे सुपुत्र व सागरी जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते सौरभ सांगवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० ते ६ वाजेपर्यंत खेळाडू नोंदणी होणार आहे. यानंतर खेळाडूंना शुभेच्छा कार्यक्रम व स्थानिक मच्छिमार बांधवांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ११ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अखिल भारतीय जलतरण संघटनेचे सरचिटणीस कमलेश नानावटी तसेच आजी माजी आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळी समुद्र किना-यावर विविध खाद्यपदार्थ स्टॉल असणार आहेत. या स्पर्धेत देशातील ४०० पुरुष व २०० स्त्री स्पर्धक सहभागी होणार आहेत. ५०० मी ते ५ किमी घेतल्या जाणारी ही स्पर्धा ६ वर्षांपासून ते वरिष्ठ अशा ९ पुरुष व ९ स्त्री गटात घेतली जाणार आहे. या स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना विनाशुल्क यलो कार्ड देऊन स्पर्धेत प्रवेश घेता येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम २ क्रमांकाना रोख रक्कम पारितोषिक, मेडल, ट्राॅफी व मेरिट प्रमाणपत्र, तिस-या क्रमांकाला मेडल व मेरिट प्रमाणपत्र तर ४ ते १० क्रमांकाना मेरिट प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष दिनेश चव्हाण, यांनी दिली आहे.